Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2025
ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि कायम दुष्काळाने ग्रासलेला बीड (Beed) आता ऊर्जा उद्योगात नवे पर्व निर्माण करत आहे. सध्या जिल्ह्यात उभ्या असलेल्या २८५ पवनचक्की प्रकल्पांबरोबरच “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) बीडमध्ये आपले पाय रोवत आहे.
जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये १६ वेगवेगळ्या कंपन्यांकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत, ज्यातून १८२ मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीजनिर्मितीवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठ्याचा टप्पा बदलणार
राज्यात शेतीसाठी पाणीपुरवठा आणि वीजनिर्मितीचा खर्च मोठा होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज देणे सरकारला शक्य होत नव्हते. मात्र, सौर ऊर्जेच्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा सौर कृषी पंपाद्वारे सातत्याने वीजपुरवठा केला जाणार आहे. यासाठी सरकारने घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ₹७८,००० सबसिडी जाहीर केली आहे.
सौर कृषी पंप योजनेची यशस्वी अंमलबजावणी
बीड जिल्ह्यातील २१,००० शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केले असून, त्यातील ४,००० शेतकऱ्यांपर्यंत कृषी पंप पोहोचले आहेत. त्यामुळे पिकांना दिवसा पाणीपुरवठा केला जात आहे, ज्यामुळे शेतीला मोठी चालना मिळत आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा आणि क्षमता
सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक मेगावॅटसाठी तीन एकर जागा लागते. बीड जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणने जागा उपलब्ध करून दिली आहे. मार्चअखेरपर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होणार आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये सहभागी कंपन्या
या क्रांतिकारक सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी आहेत:
- रिलायन्स इंडस्ट्रिअल लिमिटेड
- यश कन्स्ट्रक्शन कंपनी
- अवादा एनर्जी प्रा.लि.
- गंगामाउली शुगर
- नथुमल वासुदेव आणि इतर
तालुकानिहाय प्रकल्पाची आकडेवारी
तालुका | गावे | मेगावॅट |
---|---|---|
अंबाजोगाई | ८ | २४ |
बीड | ३ | १० |
धारूर | २ | ४ |
गेवराई | १० | ३५ |
केज | ६ | २२ |
परळी | ४ | २६ |
वडवणी | ३ | १५ |
ऊर्जा क्रांतीचे फायदे
सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर महावितरणकडून सातत्याने शेतीसाठी वीजपुरवठा केला जाईल, ज्यामुळे वीज भार कमी होऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज वेळेवर उपलब्ध होईल.
बीड जिल्हा ऊर्जा क्रांतीचे नवे केंद्र बनत आहे, ज्यामुळे केवळ वीज समस्या सोडवली जाणार नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीसाठीही मदत होईल.