Nutrient deficiency solutions to improve crop health in marathi
शेतीत चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची पूर्तता करणे महत्त्वाचे असते. मात्र, पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो. यामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग होऊ शकतात. पिकांवर होणारी अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची आणि त्यावर उपाययोजना कशा करायच्या, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अन्नद्रव्यांची कमतरता: लक्षणे आणि उपाययोजना
1) नत्र (Nitrogen)
लक्षणे:
- झाडांच्या खालच्या पानांचा रंग पिवळसर होतो.
- मुळांची आणि झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंटते.
- पानांची संख्या कमी होऊन फळे किंवा फुले कमी लागतात.
उपाय:
- झाडांवर 1% युरियाची फवारणी करावी (10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम युरिया मिसळा).
- शेतातील मातीच्या प्रकारानुसार नत्रयुक्त खते योग्य प्रमाणात द्यावीत.
2) स्फुरद (Phosphorus)
लक्षणे:
- पानांचा रंग हिरवट लांबट होतो आणि त्यांची वाढ खुंटते.
- पानांच्या मागील बाजूस जांभळट छटा येते.
- झाडाची मुळे कमकुवत होतात.
उपाय:
- 1 ते 2% डीएपीची फवारणी करावी.
- शेतात स्फुरदयुक्त खते टाकून कमतरता भरून काढा.
3) पालाश (Potassium)
लक्षणे:
- पानांच्या कडांवर तांबट किनार तयार होते.
- पानांवर पिवळसर आणि तांबडे ठिपके दिसतात.
- झाडाची वाढ खुंटून शेंडे गळून पडतात.
उपाय:
- 1% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.
- जमिनीत पालाशयुक्त खतांचा पुरवठा करावा.
4) लोह (Iron)
लक्षणे:
- शेंड्याजवळील नवीन पानांच्या शिरा हिरव्या राहतात, परंतु शिरांमधील भाग पिवळसर दिसतो.
- झाडाची वाढ खुंटते.
उपाय:
- 0.2% चिलेटेड लोहाची फवारणी करावी.
- प्रति हेक्टर 25 किलो फेरस सल्फेट मातीमध्ये मिसळून द्यावे.
5) बोरॅान (Boron)
लक्षणे:
- झाडाचा शेंडा किंवा कोवळ्या पानांचा रंग पांढरट होतो.
- पानांवर सुरकुत्या येतात, तसेच पिवळसर चट्टे पडतात.
- फळांवर तांबडे ठिपके दिसून भेगा पडतात.
उपाय:
- 0.5% बोरीक ॲसिडची फवारणी करावी.
- जमिनीत योग्य प्रमाणात बोरॅानयुक्त खते मिसळा.
6) जस्त (Zinc)
लक्षणे:
- पानांचा आकार लहान होतो आणि शिरांमधील भाग पिवळसर दिसतो.
- पानं कोरडी आणि वाळलेली दिसतात.
उपाय:
- 0.2% चिलेटेड झिंकची फवारणी करावी.
- प्रति हेक्टर 10 ते 20 किलो झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे.
7) मंगल (Manganese)
लक्षणे:
- पानांच्या शिरा हिरव्या राहतात, परंतु शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळसर, करडसर होतो.
- शेवटी पानं फिकट होऊन गळून पडतात.
उपाय:
- 0.2% चिलेटेड मंगलची फवारणी करावी.
- प्रति हेक्टर 10 ते 25 किलो मँगनीज सल्फेट जमिनीत टाकावे.
8) मॉलिब्डेनम (Molybdenum)
लक्षणे:
- पानांचा रंग पिवळसर होतो आणि त्यावर तपकिरी ठिपके पडतात.
उपाय:
- प्रति हेक्टर 250 ते 500 ग्रॅम सोडियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळून द्यावे.
9) तांबे (Copper)
लक्षणे:
- शेंड्यांची वाढ खुंटते.
- डायबॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- पाने गळून पडतात.
उपाय:
- 0.4% मोरचूदची फवारणी करावी.
- जमिनीत तांबेयुक्त खते योग्य प्रमाणात मिसळा.
10) गंधक (Sulphur)
लक्षणे:
- पानांचा हिरवा रंग कमी होऊन पानं पिवळसर किंवा पांढरी होतात.
उपाय:
- प्रति हेक्टर 20 ते 40 किलो गंधक शेणखताबरोबर मिसळून द्यावे.
शेतीत उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
अन्नद्रव्यांची योग्य प्रमाणात पूर्तता करून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची उत्पादकता वाढवू शकतात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या नुकसानीला वेळेवर उपाययोजना केल्यास रोखता येते. पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य होते.
(टीप: नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि शेतातील परिस्थितीनुसार उपाययोजना ठरवा.)
अल्पभूधारक शेतकरी योजना: अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे मिळवायचे? अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे!